अदानी प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली : उद्धव ठाकरे

मुंबई : अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला. आपल्याकडचे स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे मात्र कायम अदानींना पाठीशी घालत आले.  अमेरिकेतील प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अदानी त्यांचे काय ते भोगतील. परंतु तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची?अदानी यांची ‘सावली’ बनलेले पंतप्रधान मोदी त्याचे काय प्रायश्चित्त घेणार आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

थेट अमेरिकी न्याय विभागानेच हे आरोप केले असल्याने अदानी समूह, मोदी सरकार आणि अदानी यांचे उठताबसता ‘वकीलपत्र’ घेणारा भाजप यांच्यात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. अपेक्षेप्रमाणे अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी त्यासंदर्भात खुलासा केला आहे. अदानी समूहाने काही खुलासा करणे एकवेळ समजून घेता येईल, परंतु भाजपने यात घेतलेली उडी म्हणजे अदानी-भाजप ‘हितसंबंधां’चा उघडउघड ‘वकालतनामा’च आहे. अर्थात, हे आरोप झाले आहेत अमेरिकेतील न्यायालयात आणि ते केले आहेत तेथील न्याय विभागाने. त्यामुळे भाजपवाल्यांनी त्यांच्या प्रिय अदानींसाठी भारतात केलेली फडफड आणि तडफड वायाच जाईल, असेही ठाकरे यांनी सुनावले आहे.

गेल्या वर्षी हिंडेनबर्ग प्रकरणात चौकशीचा फार्स भारतात असल्याने मोदी आणि त्यांच्या सरकारला अदानी यांना वाचविणे शक्य झाले होते. त्या प्रकरणात ना ‘सेबी’च्या तत्कालीन अध्यक्षा माधवी बूच आणि त्यांच्या पतीवर काही कारवाई झाली होती ना अदानी समूहावर. मात्र आता ‘आरोपीचा पिंजरा’ अमेरिकेतील न्यायालयामधील आहे. त्यामुळे तेथील ‘हातोडय़ा’ने अदानी यांना किती मोठे ‘टेंगूळ’ येते आणि त्याच्या वेदना मोदी सरकारला किती होतात, हे पाहावे लागेल. मुळात अदानी, लाचखोरीच्या माध्यमातून त्यांनी मिळविलेली देश-परदेशातील कोटय़वधींची कंत्राटे आणि त्यासाठी त्यांना होणारी मोदी सरकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत या एकाच नाण्याच्या ‘तीन बाजू’ आहेत. या तिन्ही बाजू जर अमेरिकन न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या तर त्यामुळे जगासमोर देशाची मान खाली झुकेल, त्याला जबाबदार कोण, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest