सत्ता स्थापनेसाठी भाजपची तयारी; विजयाची शक्यता असलेल्या बंडखोरांशी संपर्क करण्याची मोठ्या नेत्यांवर जबाबदारी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. २३) लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी सर्वच संस्थांनी जाहीर केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. २३) लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी सर्वच संस्थांनी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होत नसले तरीदेखील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी सत्तास्थापनेची तयारी म्हणून भाजपच्या वतीने विजयाची शक्यता असणाऱ्या पक्षाच्या बंडखोर आमदारांशी मोठ्या नेत्यांकडून संपर्क साधला जात आहे.

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता संपली असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार? याविषयी अंदाज लावले जात आहेत. मात्र अनेक मीडिया संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच राहील, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करताना अपक्षांची मदत लागू शकते. याची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक बंडखोर या निवडणुकीत उभे होते. यातील विजयाची शक्यता असणाऱ्या बंडखोरांशी आतापासूनच संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या राज्यातील मोठ्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. विजयी झालेल्या बंडखोरांवर झालेली पक्षांतर्गत कारवाईदेखील मागे घेण्याचे ठरले आहे.  

महायुतीच्या वतीने जागावाटपात भाजपला न सुटलेल्या जागांवर भाजपतील इच्छुकांनी निवडणुकीत शड्डू ठोकत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील काही उमेदवारांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना पुन्हा एकदा भाजपसोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा बंडखोरांवर पक्षाने आधीच निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची तयारी पक्षाने सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढली आहे, तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही महिलांची असल्याचा दावादेखील त्यांनी केला.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest