‘वेदोक्त’प्रकरणाची १२२ वर्षांनी पुनरावृत्ती
#नाशिक
माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांकडून वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निमित्ताने तब्बल १२२ वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांसोबत घडलेल्या वेदोक्त प्रकरणाची लज्जास्पद पुनरावृत्ती पुरोगामित्वाच्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्रात झाली आहे.
१९१४ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास पुरोहितांनी नकार दिला होता. त्या विरोधात शाहू महाराज यांनी मोठा लढाही दिला, पण काळ बदलला. तंत्रज्ञानाचं युग आलं. त्यामुळे काळानुसार लोक बदलतील, जातीप्रथा गळून जातील असं वाटलं होतं. सव्वाशे वर्षे होत आली तरी पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील परिस्थिती फारशी बदलली नसल्याचं दिसून येत आहे. संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. ऐतिहासिक काळाराम मंदिरात घडलेला प्रसंग खुद्द संयोगीताराजे यांनीच उघड केला. हा प्रकार त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून सांगितला आहे. संयोगीताराजे यांनी यावेळी काळाराम मंदिरातील पुजाऱ्याला खडेबोल सुनावल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वी जे शाहू महाराजांबाबत घडलं तेच संयोगीताराजेंबाबत घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
माजी खासदार संभाजी छत्रपती यांचा मागच्या महिन्यात वाढदिवस झाला. पहिल्यांदाच संभाजी छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. संयोगीताराजे या सुद्धा नाशिकमध्येच होत्या. त्यामुळे संयोगीताराजे या संभाजी छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात गेल्या होत्या. मंदिरात दर्शन घेत असताना त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंताने मज्जाव केला. त्यामुळे त्या संतापल्या. त्यांनी या महंताला सुनावले. झाला प्रकार त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कथन करताना ‘‘आपण सर्वजण देवाची लेकरे... आणि लेकरांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संयोगीताराजे यांची पोस्ट
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षाही म्हटली.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!