मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी चर्चा केली नाही
#मुंबई
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे नऊ महिने झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही,’ अशी नाराजी मंगळवारी (दि. ११) व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे वक्तव्य करत विरोधकांसह ठाकरेंचेही कान टोचले. ‘‘चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्पपरिणाम होतात,’’ असे खडेबोलदेखील त्यांनी सुनावले.
नाट्यमय घडामोडी घडून नऊ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरावर पवार यांनी आपली मते मांडली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते. आम्ही तीन पक्षांनी मिळून सरकार बनवले होते. अर्थात राजीनामा देण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे. मात्र, राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने ठाकरे यांनी आमच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही, हे वास्तव आहे. ते नाकारण्यात काही अर्थ नाही. आता या व्यक्तिरिक्त दुसरा विचार कुणी करत असेल तर तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती,’’ असेही पवार यांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वीच फडतूस गृहमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. त्याला फडणवीस तसेच भाजप नेत्यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. यावरून राजकारणातील घसरत चाललेल्या टीकेच्या पातळीवरूनही पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुनावले. जनतेला अशी वैयक्तिक टीका-टिप्पणी आवडत नाही. त्यामुळे नेत्यांनी शक्यतो अशा गोष्टी टाळायला हव्यात. त्याऐवजी नेत्यांनी लोकांच्या समस्यांवरून आक्रमक व्हावे. वैयक्तिक चिखलफेक काही कामाची नाही,’’ असे ते म्हणाले.
कोण कोणासोबत जाईल सांगता येणार नाही...
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेमुळे राज्यात भूकंप आला होता. राज्याच्या राजकारणात आजही पहाटेच्या शपथविधीची चर्चा होते. यावर शरद पवार म्हणाले, ‘‘कोण कशी भूमिका घेईल, हे आज सांगता येणार नाही, पण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. मला आता तरी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, उद्या कोणी वेगळे जाण्याचा निर्णय घेतला तर तो त्याचा निर्णय असेल.’’ वृत्तसंस्था