आव्हाडांविरोधात साक्ष देण्यासाठी वैभव कदमांवर होता प्रचंड दबाव
#मुंबई
माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साक्ष द्यावी, यासाठी त्यांचा सुरक्षारक्षक वैभव कदम यांच्यावर पोलिसांचा प्रचंड दबाव होता. यातून त्यांनी आत्महत्या केली. केवळ आव्हाडांना अटक करण्यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि. ४) केला.
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मात्र, ठाणे शहर आणि जिल्हा त्यांच्या हातात नाही. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या का केली? आव्हाड यांच्या विरोधात साक्ष आणि पुरावे द्यावे, यासाठी वैभव आणि त्यांचे सहकारी यांच्यावर मोठा दबाव पोलिसांकडून टाकण्यात आला. त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘‘वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, याच्या खोलात कुणी गेले का? वैभव कदमला पोलीस स्टेशनला बोलवत टॉर्चर करण्यात येत होते. दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यात जितेंद्र आव्हाड आरोपी आहेत. त्यांच्याविषयी आम्ही जे सांगतो तसे बोला, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साक्ष द्या, त्यासाठी त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली.’’
जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘‘जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वैभव कदम यांच्यासोबत असलेल्या ६ ते ७ पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. खूप वेळ चौकशीसाठी बसवले जात आहे. आम्ही बोलतो तशी साक्ष आणि पुरावे तुम्ही द्या, असे म्हणत वैभव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव आणण्यात येत होता. त्यामुळे वैभव कदम यांनी आत्महत्या केली, यामागचे कारण शोधण्यासाठी खोलात जाण्याची गरज आहे.’’ वृत्तसंस्था