हे तर भिजलेले काडतूस
#मुंबई
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फडतूस’ या शब्दावरून केलेल्या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी फडतूस नाही काडतूस’ असे उत्तर दिले होते. त्यांच्या या वक्तव्याची ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवताना फडणवीस हे भिजलेले काडतूस असल्याचे खोचक वक्तव्य केले.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ‘मै झुकेगा नही, मै घुसेगा’ असं म्हणत फडणवीस यांनी नंतर ‘फडतूस’ या टीकेला उत्तर देताना ‘मी फडतूस नाही काडतूस’ असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी बुधवारी फडणवीसांची खिल्ली उडवली. ‘‘ईडी, सीबीआय हेच तुमचे खरे काडतूस आहेत. एकदा त्यांना बाजूला करा. मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो,’’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी पलटवार केला.
संजय राऊत म्हणाले, ‘‘आम्ही कुठे बोललो झुका म्हणून, हे सगळे झुके आहेत. डॉक्टर मिंधे यांच्या टोळीने आमच्या एका महिलेवर हल्ला केला. ती मातृत्वाचे उपचार घेत असूनही तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. तिच्यावर हल्ला करण्याचे कारणच काय होते? या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले होते. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांनी खूपच सौम्य शब्दात टीका केली. फडतूसचा डिक्शनरीत अर्थ पाहिला तर तो मिनिंगलेस, बिनकामाचा असा आहे. त्यामुळे तो शब्द एवढा आत घुसण्याचे कारण नव्हते. कदाचित नागपुरात फडतूसचा अर्थ वेगळा असेल.’’
देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी काडतूस आहे,’ असे वक्तव्य करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. त्याची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले, ‘‘हे तर भिजलेले काडतूस आहेत. तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या. तुम्ही गृहमंत्री झाल्याची अडचण महाराष्ट्राला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या.’’
राज्यात याआधी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये झाली तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही, असा सवाल करीत संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांवर कधी गौरव यात्रा का काढली नाही या काडतुसांनी", असा प्रश्नही राऊत
यांनी विचारला.वृत्तसंस्था