गाव विकणे आहे...
#नाशिक
वाढत्या महागाईमुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण गाव विकण्याचाच निर्णय घेतला आहे. गावातील संपूर्ण शेतजमीन विकत घ्यावी, यासाठी संपूर्ण गावाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील माळवाडी (ता. देवळा) गावच्या नागरिकांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. या गावातील नागरिकांची ५३४ हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ संपूर्ण गाव विकण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. कांद्यासह अन्य शेतमालाला भाव मिळत नसल्यानं उदरनिर्वाह करण्यासाठी गावच विकण्याची भूमिका गावकऱ्यांनी एकमुखाने घेतली आहे. हा ठराव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
माळवाडी गावाच्या परिसरातील शेतांमध्ये भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि कांदा पिकवला जातो. कांदा नगदी पीक असल्याने गावातील ९५ टक्के शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतमालाला तुटपुंजा भाव मिळत असल्याने यातून शेतातील खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माळवाडीतील शेतकऱ्यांनी बैठक बोलावली होती.
कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा आवश्यक पैसादेखील शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून मिळत नाही. खासगी आणि सरकारी बँकेचे कर्जसुद्धा फेडले जात नाही. त्यातच शासन शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील नसल्याने शेतकऱ्यांनी गावच विकायचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून आलेल्या पैशांतून उदरनिर्वाह करू अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे. दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने संपूर्ण गाव विकण्याचा बैठकीत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावावर सर्वांच्या सह्यादेखील घेण्यात आल्या आहेत. गावातील शेतजमीन केंद्र आणि राज्य सरकारने विकत घेऊन पैसा द्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.वृत्तसंस्था