एप्रिलपासून वीज दरवाढीचा धक्का ?
#मुंबई
राज्यात एप्रिलपासून विजेचे दर वाढण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेला प्रती युनिटमागे जवळपास अडीच रुपयांचा भुर्दंड वीज दरवाढीमुळे बसण्याची शक्यता आहे. वीज नियामक आयोग शुक्रवारी (३१ मार्च) विजेचे नवे दर निश्चित करून त्याबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्चअखेर ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची चिन्हे आहेत.
महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरणने २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी ६७ हजार कोटींच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या विजेच्या दरात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होईल असा दावा ग्राहक संघटनांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने केवळ एक रुपया दरवाढ होईल, असे स्पष्ट केले आहे. महावितरणचे संचालक विश्वास पाठक म्हणाले की, तूट भरून काढण्यासाठी २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी १४ आणि ११
टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित आहे. ती एक रुपयाच्या जवळपास असेल. तसेच स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचाही समावेश केलेला आहे. ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे की, स्थिर, वीज व वहन आकाराचा हिशोब केल्यास ग्राहकांना प्रतियुनिट अडीच रुपयांनी वीज महाग मिळेल.
असे वाढतील दर
महावितरणने इंधन समायोजन आकारासह २५ टक्के दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. घरगुती ग्राहकांसाठी सध्या इंधन समायोजन आकारासह विजेचा दर प्रतियुनिट ७.७९ रुपये आकारला जातो. वीज नियामक आयोगाने महावितरणचा प्रस्ताव मान्य केल्यास विजेचा दर २०२३-२४ मध्ये ८.९० रुपये, तर २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये होणार आहे. म्हणजेच विजेचे दर प्रतियुनिट अनुक्रमे १.११ रुपये आणि २.१३ रुपयांनी वाढणार आहेत. वीज शुल्काचा भार पकडून ही वाढ २.५५ रुपयांपर्यंत होणार असल्याचा दावा राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.
महागडी वीज
आंध्र प्रदेशमध्ये अधिभारासह कमीत कमी १.९ आणि जास्तीत जास्त ९.७५ रुपये, गुजरात ३.५ ते ५.२, दिल्ली ३ ते ८ रुपये, गोवा १.६ ते ४.५ रुपये वीज दर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात ५.३६ ते १५.५६ रुपये प्रतियुनिट दराने
वीज मिळते. म्हणजेच इतर राज्यांच्या तुलनेत तीन पटीने वीज बिल जास्त आहे. असे असूनही नव्याने वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे.