शेतकरीप्रश्नी सरकारला चर्चाही नकोशी
#मुंबई
अवकाळी पावसामुळे राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (दि. ८) केवळ शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला.
केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. ‘‘बुधवारी केवळ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा करावी,’’ अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीदेखील ‘‘राज्यात अवकाळीमुळे बळीराजासमोर पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत इतर सर्व मुद्दे बाजुला करुन या दिवशी केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी,’’ असे सांगत मागणी लावून धरली.
मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणे नाकारले. ते म्हणाले, ‘‘राज्यात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याविषयी आम्ही माहिती मागितली आहे. तसेच, पंचनाम्यानंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवले आहेत. ते पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल.’’ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
सभात्याग केल्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासदेखील सरकारने नकार दिला आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी उघड्यावर येईल. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, आम्ही शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देऊ.’’
वृत्तसंस्था