अंधारेंनी शिरसाटांवर ठोकला अवघ्या तीन रुपयांचा दावा

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी दुपारी (दि. ३) आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात शिवाजीनगर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. विशेष म्हणजे, हा दावा केवळ तीन रुपयांचा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:29 am
अंधारेंनी शिरसाटांवर ठोकला अवघ्या तीन रुपयांचा दावा

अंधारेंनी शिरसाटांवर ठोकला अवघ्या तीन रुपयांचा दावा

#पुणे

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी दुपारी (दि. ३) आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात शिवाजीनगर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. विशेष म्हणजे, हा दावा केवळ तीन रुपयांचा आहे.

ठाकरे गटाला नवसंजीवनी देण्यासाठी आखलेल्या योजनेनुसार मुलुखमैदान तोफ सुषमा अंधारे यांनी राज्यभरात सभा घेण्याचा धडाका लावला आहे. या सभांमध्ये त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवर जोरदार टीका करीत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून शिंदे गटातील आमदारांनी अंधारे यांना प्रत्युत्तर देणे सुरू केले. आरोप-प्रत्यारोपांच्या या खेळात संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटकपक्ष आक्रमक झाले.

आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, ‘‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तारभाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊपण माझेच भाऊ आहेत म्हणते. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.’’ शिरसाट यांच्या या वक्तव्याविरोधात अंधारे ३  रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.

शिरसाट वक्तव्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासासाठी उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. शिरसाट यांच्या भाषणाची क्लीप तपासली जाणार आहे. त्यातील ‘लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का, याचीही चौकशी सुरू असल्याचे समजते.

शिरसाट यांच्या या वक्तव्याबद्दल सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी. त्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. या प्रकरणी महिला आयोगाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

आमदार संजय शिरसाट आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘‘सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी एकही अश्लील शब्द बोललो नाही. असा शब्द बोलल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ,’’ असे आव्हान त्यांनी दिले आहे. सुषमा अंधारे या मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या देतात. मात्र, आम्ही केवळ त्या महिला म्हणून गप्प बसायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी संजय शिरसाट यांच्या वर्मावर बोट ठेवून काही प्रश्न विचारले. ‘‘शिरसाट हे विकृत प्रवृत्तीचे नाव आहे. असे राजकारणी नेहमीच महिलांबद्दल असभ्य बोलतात. यातून त्यांची वैचारिक लायकी दिसते. मुळात शिरसाटांनी अंतरंगात डोकावून पाहात या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. संभाजीनगरमध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला आमदार संजय शिरसाट का अडकवू पाहात होते, शिरसाटांकडे ७२ कोटी रुपये आले कुठून? त्यांना ब्लॅकमेल करून यातून ५ कोटी मागणारी व्यक्ती कोण होती, आठ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ७२ व्या मजल्यावर शिरसाट यांनी कुणासाठी कोट्यवधींचा फ्लॅट घेतला. दोन महिन्यांपूर्वी शिरसाट यांना हार्टअटॅक आल्याने मुंबईला नेण्याचे नाटक झाले, ते प्रकरण नेमके काय,’’ असे शिरसाट यांना अडचणीत आणणारे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest