भाजपच्या खासदाराने केली सत्तेसाठी काँग्रेससोबत युती
#अमरावती
केंद्रीय तसेच राज्य पातळीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांचे नेतृत्व एकमेकांवर तुटून पडत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र, हे दोन्ही पक्ष अमरावती जिल्ह्यातील वरुड बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
काँग्रेसवर ऊठसूट टीका करणारे भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेससोबत ही चर्चित युती केली आहे. यामुळे खुद्द भाजपमधूनही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपतील काही घटकांसह सर्वसामान्य नागरिकदेखील या युतीबाबत दोन्ही पक्षांवर टीका करीत आहेत.
अमरावतीच्या वरुड बाजार समितीत भाजपची कट्टर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत युती झाली आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ही युती घडवून आणली आहे. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे यांच्या बाजूने अनिल बोंडे यांचा गट लढणार आहेत. खुद्द बोंडे त्यांचा प्रचार करणार आहेत.
बोंडे वारंवार काँग्रेसवर टीका करत असतात. राहुल गांधी यांच्यावर ते संधी मिळेल तेव्हा तोंडसुख घेत असतात. तसेच महाविकास आघाडीची युती ही अभद्र युती असल्याचं सांगत असतात. मात्र, वरुडच्या बाजार समितीत आपल्यासाठी सत्तेचा खेळ जुळेनासा झाल्यावर बोंडे यांनी थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल बोंडे यांच्या या निर्णयाने अमरावतीचे राजकारण ढवळून निघाले आहे. बोंडे यांच्या या कृतीचे अनेक राजकीय संकेत काढले जात आहेत.
बोंडे हे फडणवीस सरकारमध्ये काही काळ कृषिमंत्री होते. नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला. यामुळे बोंडे काही काळ बाजूला पडले. मात्र, राज्यसभेला संधी देत भाजपने त्यांचे पुनर्वसन केले.
वृत्तसंस्था