ठाकरे, फडणवीस संघर्ष शिगेला
#मुंबई
आपापल्या पक्षाचे नेतृत्व करणारे आणि एकत्रितपणे पाच वर्षे महाराष्ट्रात सत्ता उपभोगणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या एकेकाळच्या मित्रांमधून आता विस्तवही जात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पोस्ट केली म्हणून रोशनी शिंदे या आपल्या कार्यकर्तीला काही ठाण्यात मारहाण करण्यात आल्यानंतर राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळत असलेल्या फडणवीसांवर ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. त्यांच्यासारख्या फडतूस गृहमंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी मंगळवारी (दि. ४) केली. त्याला प्रत्युत्तर देताना ‘फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे,’’ असे फडणवीस यांनी सुनावले.
ठाकरे गटाच्या ठाण्यातील पदाधिकारी रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकली, म्हणून त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रकार ठाण्यात घडला. सध्या शिंदे यांच्यावर खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘‘रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी अमानुष हल्ला केला. स्थानिक पोलिसांनी अद्याप या घटनेचा एफआयआर दाखल केलेला नाही,’’ असा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक असा शब्द वापरला, असे मी ऐकले. त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. या ठाण्याची ओळख जिवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे, सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी आहे. ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे असे करण्याचा एक प्रयत्न सुरू झाला आहे.
आजपर्यंत गॅंग हा शब्द आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण आता महिलांची गॅंग बनायला लागली आहे.’’
सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यानंतर महिला गुंडांकडून हल्ले करणारे हे नपुंसकच म्हणायला पाहिजे. या संदर्भात तक्रार करायला पोलीस आयुक्तालयात गेलो तर आयुक्तच नव्हते. रोशनी मातृत्वासाठी उपचार घेत होती. ती हात जोडून मारहाण करणाऱ्यांना सांगत होती की, ‘पोटात काय मारू नका. लांबून बोला.’ तरीसुद्धा तिला पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या. हे अत्यंत निर्घृण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीची नाहीत. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. लाचार, लाळघोटे करणारे, नुसते फडणवीसी करणारा माणूस गृहमंत्रिपद मिरवतोय. गृहमंत्रिपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायची,’’ असा तिरकस सवालही ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री, असा प्रश्न आता पडला आहे. एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती.’’
ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ‘फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे,’ असे फडणवीस यांनी सुनावले. ते म्हणाले, ‘‘
दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेले. मात्र, तुम्ही राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आमचे तोंड उघडले तर त्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला. हा जो थयथयाट आहे, ते फ्रस्ट्रेशन असून, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही. मोदींचे फोटो लावून निवडून येता. विरोधकांची लाळ घोटता. तेव्हा खरा फडतूस कोण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मी पाच वर्षे राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पुन्हा गृहमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मात्र, मी गृहमंत्रिपद सोडणार नाही.’’ वृत्तसंस्था