'Babri' : ‘बाबरी’वरून शिळ्या कढीला ऊत

महाराष्ट्रातील सरकार टिकणार की जाणार, याबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचे जुने कार्ड नव्याने खेळायला सुरुवात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:06 am
‘बाबरी’वरून शिळ्या कढीला ऊत

‘बाबरी’वरून शिळ्या कढीला ऊत

हिंदुत्वाचे कार्ड खेळणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अयोध्या दौऱ्यानंतर ठाकरेंना डिवचले

#मुंबई

महाराष्ट्रातील सरकार टिकणार की जाणार, याबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचे जुने कार्ड नव्याने खेळायला सुरुवात केली आहे. यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अयोध्या दौऱ्यानंतर आता १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याचा जुना विषय उकरून काढण्यात आला आहे. ‘‘बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी चार सरदार तरी पाठवले काय,’’ असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी (दि. ११) उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडले.

‘‘बाबरी आम्ही पाडली,’’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली.  मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का? अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठीशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते.’’ संजय राऊत शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तरी होते का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावा केला.

पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले. खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटलांनी केलेला दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का ? शिंदेंना हा दावा मान्य नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा.’’ भाजपला शिवसेनेचे अस्तित्व संपवायचे आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटलांनी जाणूनबुजून हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजपच बोलला आहे. नाहीतर एवढ्या वर्षांनी चंद्रकांत पाटील यांना बोलण्याची गरज काय होती? मिंधे गटात कोणी खऱ्या आईचे दूध प्यायलेला आहे का, जो शिवसेना प्रमुखांच्या अपमानाविरोधात मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे आव्हान संजय राऊतांनी दिले. एकनाथ शिंदे हे चंद्रकांत पाटलांना खडे बोल सुनावण्याची हिंमत दाखवणार नाहीत. कारण ते गुलाम झाले आहेत, असेही राऊत यांनी सुनावले.

संजय राऊत म्हणाले, बाबरी तोडल्यानंतर भाजपने या घटनेसाठी आपण जबाबदार नसल्याचे म्हटले होते. बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केले, हा इतिहास आहे. मात्र, आम्ही पळपुटे नव्हतो. बाळासाहेब ठाकरे तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वासाठी जो त्याग केला, त्या त्यागावरच आज भाजप उभा आहे. तोच भाजप आज बाळासाहेबांवर चिखल उडवत आहे आणि त्याच चिखलात मिंधे सरकार बसले आहे. शिंदे गटाला आता हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आम्ही सत्तेचे, भाजपचे गुलाम झालो आहोत, असे शिंदेंनी जाहीर करून टाकावे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.  तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.’’

बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.  ते म्हणाले, बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. त्यावेळी 'गर्व से कहो, हम हिंदू है', हा नारा त्यांनीच दिला होता. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले होते, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले.’’

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest