... तर मिश्याच काय पण भुवयाही काढून टाकेन
#सातारा
सातारा शहरातील राजकारण खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्याभोवती फिरत असते. स्थानिक राजकारणातून उभय नेत्यांतील वाद साऱ्या राज्याला माहीत आहे. आताही या दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू असून एका आरोपाला उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. आपल्या आघाडीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर मिश्याच काय पण भुवयाही काढून टाकेन.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमी सुरू असतात. तसेच दोघेही परस्परांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सातारा पालिकेवर सध्या उदयनराजे अध्यक्ष असलेली सातारा विकास आघाडी सत्तेवर आहे. या आघाडीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, भ्रष्टाचार केल्याचे कोणी बोलले तर देवाशपथ सांगतो मिश्याच काय पण भुवयाही काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही. आज साताऱ्यात फक्त लोकांची सेवा करण्यासाठी आहे. आम्हाला वारसा मिळाला आहे, तो पुढे नेण्याचे काम आम्ही करतो, तो वारसा आम्ही जपतो. आमच्या अगोदर सत्तेवर असलेल्यांनी काय जपलंय. बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोला, तुम्ही सांगा पुरावे काय ते. ज्यांची बौद्धिक पात्रताच खुजी आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेले नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत.
पुढे उदयनराजे म्हणतात की, शहराचा विकास करण्यात तुम्हाला कोणी अडवले होते की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली. आम्हाला नावे ठेवा, पण तुम्ही साताऱ्याच्या नागरिकांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा.
एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिश्याच काय भुवयादेखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही, असं थेट आव्हानही उदयनराजे यांनी दिले.