अयोध्येतून शिंदेंचे ठाकरेंवर शरसंधान
#अयोध्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर मोठया प्रमाणात टीका करीत आहेत. रविवारी (दि. ९) अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी तेथेही हाच प्रकार सुरू ठेवला. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतून त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक मुद्द्यांवरून ठाकरेंवर शरसंधान साधले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लखनौहून अयोध्येत दाखल झाले. येथे पोहोचताच शासकीय प्रोटोकॉलनुसार दोघांचेही स्वागत करण्यात आले. अयोध्येत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत जय श्री रामच्या जोरदार घोषणा दिल्या गेल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वासाठी बंड केल्याचा दावा केला. ते पुढे म्हणाले, ‘‘खासदार नवनीत राणा यांच्यासारख्या हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना कोठडीत टाकणारे खरे तर रावण आहेत. महाराष्ट्रात आता रामराज्य येईल. कोणतेही साधूकांड होणार नाही.’’
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिराचे निर्माण होईल. रामभक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. अयोध्येचा दौरा हा राजकीय नाही. मी अयोध्येला यापूर्वीही भेट दिली आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून मी येथे पहिल्यांदाच आलो आहे. आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना प्रभू रामाचा आशीर्वाद घ्यायचा होता. यासाठी अयोध्या दौरा आहे. जंगी स्वागत केल्याबद्दल मी योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे आभार मानतो,’’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
रॅलीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘अयोध्येत आल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. जो रामाचे नाव घेईल तोच या देशावर राज्य करेल. महाराष्ट्रातही रामाला मानणाऱ्यांचे सरकार आले आहे. आज अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होत आहे, त्यासाठी मी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.’’ शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली. यावेळी शिंदे सेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शिंदे, फडणवीसांसह नेते, आमदार यांनी राम मंदिराची पाहणी केली. शिंदे-फडणवीस यांनी हनुमान गढीवर जात हनुमानाचे दर्शन घेतले. तेथे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी या दोघांचीही भेट घेतली.
अयोध्येतील राम मंदिराच्या खिडक्या आणि दरवाजांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सागवान लाकूड निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते लाकूड मंदिर व्यवस्थापनाला दिले. डेहराडूनस्थित राष्ट्रीय वन संशोधन संस्थेने राममंदिर व्यवस्थापनाला चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकूड वापरण्याचा सल्ला दिला होता. हे लाकूड सुमारे एक हजार वर्षे जुने आहे. अयोध्येतील दिगंबर जैन मंदिरात माता ज्ञानमती यांनी शिंदे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या निर्माणावस्थेत असलेल्या रामाच्या भव्य मंदिराचा आढावा घेतला. शरयू नदीवर महाआरती केल्यानंतर शिंदे यांनी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. यादरम्यान, उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारण्याची आग्रही मागणी शिंदे यांनी केल्याचे सांगण्यात येते.
वृत्तसंस्था