शरद पवार यांची सत्तेसाठी नवी खेळी?
#मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्तेसाठी नवी खेळी करून भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राज्याच्या सत्तावर्तुळात रंगली आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवासांपासून घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडी बघता सत्तास्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर शरद पवार यांनी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे गटापेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे िचत्र आहे.
शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अलीकडील काळात शरद पवारांनी भाजपसाठी अनुकूल ठरेल, अशी घेतलेली भूमिका त्याचाच भाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. पवार यांच्या भूमिकेवर चहुबाजूंनी टीका झाल्यावर त्यांनी याचे खंडन केले असले तरी काॅंग्रेस आणि ठाकरे गटाला ‘जर-तर’च्या खेळात असे होण्याची शक्यता वाटत आहे. यापूर्वी, २०१४ मध्ये सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असताना पवार यांनी भाजपने मागणी न करतादेखील सत्तास्थापनेसाठी त्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले. त्यानंतर अदानी प्रकरणात पंतप्रधान मोदींना सोईस्कर ठरेल, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी नाराजी व्यक्त करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणून वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे शक्यता?
एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय येत्या काही दिवसांत यावर निर्णय देणार आहे. हे आमदार अपात्र ठरले तर शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. तसेच त्यांच्या गटाचे संख्याबळही घटेल. अशा परिस्थितीत अडचणीत येणाऱ्या भाजपला पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस करू शकते. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपद देण्याचा फाॅर्म्युला पुढे येऊ शकतो. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. तसेच महाराष्ट्रातही घडू शकते. वृत्तसंस्था