‘सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’
#मालेगाव
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रविवारी दिला. तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला असल्याचा मुद्दा शिवसेना-शिंदे गट आणि भाजपने उपस्थित केला आहे. त्यातून ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर भाष्य केले. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. मात्र, आमचे दैवत असलेल्या सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे सांगून ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांची शनिवारची पत्रकार परिषद चांगली झाली. त्यांनी त्यात चांगले मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, त्यांनी सावरकर यांचा अपमान करू नये. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. आम्ही दैवताचा अपमान सहन करणार नाही. सावरकर यांनी जे केले ते येड्यागबाळ्याचे काम नाही. सावरकरांनी १४ वर्षे छळ सोसला. जसे आपले क्रांतिकारक बळी गेले, तशाच मरण यातना सावरकर १४ वर्ष सोसत होते. आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र लढत आहोत. त्याला फाटे फोडू नका. आम्ही सावरकर भक्त आहोत. भाजपमध्ये काही सावरकर भक्त आहेत, तर काही अंध भक्त झालेत.
तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते म्हणाले की, मोदी म्हणजे भारत तुम्हाला मान्य आहे का, मोदी यांच्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले होते का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. भाजप म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असल्याची टीका त्यांनी केला. कोणाच्या मुलांच्या, पत्नीवर आरोप करतात. मात्र यांच्या नेत्यांवर, कुटुंबीयांवर आरोप केल्यावर परराज्यात जाऊन अटक करतात. तुम्ही विरोधकांच्या घरात जाता. लालुप्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करता, अनिल देशमुख यांच्या सहा वर्षांच्या नातीची चौकशी करता, असा संतप्त सवाल उद्धव यांनी केला.