राज्यभर आता सावरकर गौरवयात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काढलेल्या विधानाने वाद सुरू आहे. राहुल यांच्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. मात्र यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कागदावर लिहून दिलेलं वाचावं लागत होतं. राहुल यांच्यावरची टीका वाचून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 02:25 pm
राज्यभर आता सावरकर गौरवयात्रा

राज्यभर आता सावरकर गौरवयात्रा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावरील टीकेचे केले वाचन

#मुंबई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काढलेल्या विधानाने वाद सुरू आहे. राहुल यांच्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. मात्र यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कागदावर लिहून दिलेलं वाचावं लागत होतं. राहुल यांच्यावरची टीका वाचून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सावरकरांवरील विधानाने तापलेल्या वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राहुल गांधींच्या निषेधाचे आंदोलन सुरू केले आहे. त्यात भर घालण्यासाठी राज्यभर सावरकर गौरवयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाला मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हाचा प्रसार करण्यासाठी राज्यभर धनुष्यबाण यात्रा काढण्याची घोषणा केली होती.  

उद्धव ठाकरेंनी मालेगाव सभेत केलेल्या विधानावर शिंदे म्हणाले, तुम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे नेमके काय करणार आहात, उशिरा सुचलेले शहाणपण असतं, त्याप्रमाणे हे बोलले. फक्त बोलून काय होणार आहे, तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून राज्यभर निषेध सुरू आहेत, कारण सावरकर हे देशभक्त होते, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

शिंदे म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल आता सगळा देश रस्त्यावर उतरला आहे. विधानसभेच्या प्रांगणातही आमच्या आमदारांनी आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याबाबत असलेली ती चिड आहे. मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. शिवसेना आणि भाजपा मिळून राज्यभर सावरकर गौरवयात्रा काढणार आहोत. सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा सुरू करत आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या केलेल्या अपमानाचा आम्ही निषेध करू. तसेच राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत तुमच्यात आहे का, असा सवालदेखील त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. सावरकरांचा राहुल गांधी वारंवार अपमान करत आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती, ती हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का? 

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अधिवेशनात हिंदुत्ववादी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. उलट राहुल गांधी यांची कायद्याने खासदारकी रद्द झाली त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून काँग्रेससोबत आंदोलन करताना आपण हे नेते पाहिले. असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर टीका केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest