संजय राऊतांची फडणवीसांना खुली ऑफर!
#मुंबई
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना भोंगा संबोधणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राऊत यांनी शुक्रवारी (दि. १४) खुली ऑफर दिली. ‘‘तुम्ही कटकारस्थाने थांबवा, आम्ही हल्ले थांबवू,’’ असे ते म्हणाले.
‘‘संजय राऊत यांचा भोंगा पहाटे वाजत असतो. ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज त्यांची टीका सुरू असते,’’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीस यांना आपल्या खास शैलीत ‘‘कायद्याने राज्य करा. लांड्यालबाड्या करून तुम्ही विरोधी पक्षांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू. मी तुम्हाला डील देतो, तुम्ही तुमची कारस्थाने थांबवा आम्ही हल्ले थांबवू. मान्य असेल तर तुम्ही सांगा,’’ अशी थेट ऑफरच दिली.
राऊत म्हणाले, ‘‘तुमच्या सागर बंगल्यासमोर येऊन मी पत्रकार परिषद घेऊ शकतो. या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, सामनाचा संपादक आहे. त्यात यांच्या पोटात दुखण्यासारखे काय?’’
‘‘काँग्रेसने सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन मोट बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राहुल गांधी यांच्या या योजनेचे आम्ही स्वागत करतो. नितीश कुमार, तेजस्वी यादव हे राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचीदेखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. त्याआधी उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. हे चांगले संकेत आहेत,’’ असे राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. वृत्तसंस्था