राऊतांनी केला बलात्कार पीडितेचा फोटो ट्विट
#सोलापूर
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. विधिमंडळाला चोर संबोधणाऱ्या संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. राऊत यांनी बार्शी येथील बलात्कार पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शनिवारी दुपारी ट्विट केला होता. यावरून पीडित अल्पवयीन मुलीची ओळख उघड करण्यासारखे कृत्य घडले आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात खासदार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी येथे ५ मार्चला एका बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोन संशयित आरोपींनी अत्याचार केला होता. त्यानंतर ६ मार्चला पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशन आणि बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात अक्षय विनायक माने (वय २३ वर्ष), नामदेव सिद्धेश्वर दळवी (वय २४ वर्ष, दोघे रा. बाळेवाडी, ता. बार्शी, जि सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेत पीडित मुलगी ही रक्तबंबाळ आणि जखमी अवस्थेत पडून असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खासदार राऊत यांनी शनिवारी दुपारी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला फोटो ट्विट करत संशयित आरोपी मोकाट आहेत. भाजप पुरस्कृत आहेत, असा आरोप केला होता. फोटोतून पीडित अल्पवयीन मुलीची ओळख दाखवण्यासारखे कृत्य केल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. अखेर बार्शी पोलिसांनी खासदार राऊत यांच्यावर भा.दं.वि.जे.जे ॲक्ट ७४, २२८-ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमधून आक्षेप घेत संजय राऊतांवरमहिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
वृत्तसंस्था