संग्रहित छायाचित्र
रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना निरोप देण्यासाठी देशभरातून असंख्य लोक मुंबईत दाखल झाले. पारशी समाजाच्या विधीनुसार रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. विद्युत दहिनीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
रतन टाटा यांचे पार्थिव मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे गुरुवारी सकाळी १०.३० ते ४ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आणि अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात आले. वरळी येथील स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. त्यानंतर स्मशानभूमीत देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी 'रतन टाटा अमर रहे' अशा घोषणाही नागरिकांनी दिल्या. तसेच रतन टाटांच्या खास 'गोवा' नावाच्या श्वानाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. दोन कर्मचारी त्याला टॅक्सीतून घेऊन आले होते.
पारसी धार्मिक विधीनुसार रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक ज्येष्ठ उद्योगपती वरळीच्या स्मशानभूमीत आले होते. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे लहान भाऊ जिमी टाटा हे वरळीतील स्मशानभूमीत आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव पार करण्यात आला.