राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. समाजातील घटकांना खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केलेला दिसत आहे. केंद्राप्रमाणे राज्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार, महिलांना सरसकट एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, ५ हजार गावांत जलयुक्त शिवार २.०, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्याने महोत्सवासाठी ३५० कोटी, अंगणवाडी, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत आदी घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Mar 2023
  • 05:11 pm
राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

शेतकऱ्यांना राज्याकडूनही सहा हजार, महिलांना सरसकट एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, फुले आरोग्य योजनेत पाच लाखांचे उपचार मोफत

#मुंबई

भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. समाजातील घटकांना खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केलेला दिसत आहे. केंद्राप्रमाणे राज्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार, महिलांना सरसकट एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, ५ हजार गावांत जलयुक्त शिवार २.०, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्याने महोत्सवासाठी ३५० कोटी, अंगणवाडी, आशा सेविकांच्या मानधनात वाढ, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत आदी घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.

अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देताना शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारही सहा हजारांची मदत देणार आहे. त्यामुळे केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा असे बारा हजार वर्षाला शेतकऱ्यांना मिळतील, या योजनेचा राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. योजनेमुळे सरकारवर ६ हजार ९०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या मदतीला नाव दिले आहे. 

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री फडणवीस यांनी  महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली. तसेच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की,  बुधवारी महिला दिन साजरा झाला. देशाची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल.

अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरून १० हजार रुपये केले असून मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये करण्याची घोषणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबरोबरच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४३५ वरून ५५०० रुपये करण्यात येईल. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांची २० हजार पदे भरणार, असेही  त्यांनी सांगितले. 

शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींची तरतूद केल्याने धार्मिक पर्यटन एकाच महामार्गावरून होणार आहे. दुसरीकडे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता करून वाढवण्यात येणार आहे. पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) या शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींची तरतूद केली आहे. शक्तिपीठ महामार्गातून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबेजोगाई ही शक्तिपीठे तसेच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी औदुंबर जोडले जाणार आहे.  

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.  रिद्धपूर  हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्त्व लक्षात घेऊन येथे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन करावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला, ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली. जुन्नरच्या बिबट सफारीवरून वाद सुरू होता. बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. त्यानंतर जुन्नरचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमधून दिली होती. 

अर्थसंकल्पात प्रामुख्याने आठ स्मारकांबाबत आर्थिक तरतूद केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदूमिल स्मारकासाठी ३४९ कोटी रुपये दिले जाणार असून आणखी ७४१ कोटी रुपये देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर आणि वढू बुद्रूक येथील स्मारकांसाठी निधी देण्यात आला आहे. पुण्यात भिडेवाडा इथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटी, मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपये, अमरावतीतील स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपये, विचारवंत कै. नरहर कुरुंदकर, विधान परिषदचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरुड (सांगली) इथल्या स्मारकासाठी निधीची तरतूद केलेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest