पुलवामा घटना ही देशद्रोह, पंतप्रधानांनी उत्तर द्यायला हवे
#नागपूर
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत जी माहिती दिली आहे, तो देशद्रोह ठरतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि. १५) केली.
नागपुरात रविवारी (दि. १६) महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. पटोले यांनी वज्रमूठ सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पटोले म्हणाले, ‘‘आपल्याच सैन्याचा मृत्यू त्या ठिकाणी घडवण्याचे हे कृत्य आहे. जनतेत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधानांनी याबाबत उत्तर द्यावे. हे उत्तर घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.’’
नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला लाखभर लोक गर्दी करतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. ‘‘या सभेला लोकांचा विरोध आहे, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र, या सभेला भाजपचा विरोध असल्याचे दिसते. या सभेला विदर्भातील सामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद लाभेल, ही भीती असल्याने भाजप या सभेला विरोध करीत आहे,’’ असा आरोप पटोले यांनी केला.
वृत्तसंस्था