आता टार्गेट मातोश्री!
# मुंबई
अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दोघांचीही एकमेकांवर पातळी सोडून टीका सुरू असतानाच फडणवीसांच्या बाजूने मैदानात उतरलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मातोश्री नावाच्या दोन्ही बंगल्यांची चौकशी करण्याचा इशारा बुधवारी (दि. ५) दिला.
उद्धव ठाकरे गटाच्या ठाण्यातील महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील महिलांनी मारहाण करण्याचे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले. त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही भर पडली आहे. मातोश्री नावाच्या दोन्ही बंगल्यांची चौकशी लावण्याचा इशारा देतानाच देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका सहन करणार नाही, असे राणे यांनी सुनावले. मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का? वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का, असेही प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्रात भवितव्य नाही, त्यांच्यामागे कुणीही जाणार नाही. मुख्यमंत्री असताना गुंडगिरी संपविली का नाही? देवेंद्र फडणवीस सर्व गोष्टी सांभाळायला समर्थ आहेत. उलट उद्धव ठाकरेंच्या काळातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मातोश्री नावाचे दोन्ही बंगले हे लीगल आहे का, हे आमचे अधिकारी चेक करतील.’’
बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असा दावा करून नारायण राणे म्हणाले, ‘‘देशाबाहेरील शक्तीसोबत संबंध असलेल्या लोकांना मंत्री केले, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा काही केले नाही. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. हिंदुत्वाचा त्याग करून पद मिळवले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाशिवाय कुणी विचारत नाही. फडणवीसांनी जर पाठ दाखवून बोट दाखवले तर उद्धव ठाकरे कधीच कारागृहात गेले असते. केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामुळे तुम्ही बाहेर आहात. राज्याचे माजी निष्क्रिय मुख्यमंत्री ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला गेले होते. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा केली. मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुशांत, दीक्षा सालियान या प्रकरणाचे काय झाले. वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का?’’ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे बघून कुणी शिवसेनेत प्रवेश केला का, मुख्यमंत्री असताना त्यांचे नेतृत्व कुणी स्वीकारले का, असेही प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.
रोशनी शिंदे यांची मोदी, फडणवीसांवर बोलण्याची औकात आहे का?
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे कार्यशून्य आणि खोटारडा माणूस आहे. रोशनी शिंदे यांची मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची औकात आहे का? मी जर पक्षात असतो तर तिला समजावून सांगितले असते. मात्र, उद्धव ठाकरेंनी तिची बाजू घेतली. सत्ता गेल्याच्या भावनेतून हे सर्व काही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना देशाचे आणि राज्याचे प्रश्नच माहीत नाहीत. त्यांनी चर्चेसाठी यावे. मग बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि शिष्य यांच्यापैकी कोणाला अक्कल आहे, हे तुम्ही ठरवा. भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती केली नसती, त्यांना आधार दिला नसता तर शिवसेनेचे आमदार निवडून आले नसते, असेही राणे म्हणाले.
वृत्तसंस्था