रोशनी शिंदेप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही
#मुंबई
ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणात अद्याप पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. पोलिसांच्या या पक्षपाती भूमिकेमुळे ठाकरे गटाचे नेते संतापले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी (दि. ४) दिला.
रोशनी शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी यांच्यात सोशल मीडियातील पोस्टवरून सोमवारी (दि. ३) संध्याकाळी वाद झाला. यावेळी शिंदे गटाच्या महिलांनी केलेल्या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला आता २४ तास उलटले असूनही पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. त्यामुळे ठाणे आणि मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाणे पोलिसांनी रोशनी शिंदे यांची तक्रार दाखल करून न घेतल्याने उद्या महाविकास आघाडीतर्फे ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.
‘‘रोशनी शिंदे यांना ४० जणांनी मारहाण केल्यानंतर त्यांची तक्रार अजूनपर्यंत ठाण्याच्या पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही. आम्ही पोलिसांना भेटायला गेलो असताना एक तासापूर्वीच आयुक्त केबिन सोडून गेले होते. अशा पोलीस आयुक्तांना हद्दपार करण्याचीही आमची मागणी आहे. एका महिलेवर हल्ला करणाऱ्या या लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद न करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आम्ही पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संपूर्ण पदाधिकारी, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,’’ अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन घटनेची माहिती घ्यावी. सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणात गुन्हा नोंद केला जावा. मात्र त्यांच्याकडून तशी काहीच कारवाई नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, परंतु लाचार असल्यामुळे उपमुख्यमंत्रिपदावर त्यांना तहान भागवावी लागत आहे, अशी खोचक टीकाही विनायक राऊत यांनी केली.
शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यासुद्धा गद्दार गटामध्ये गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे कर्तव्य आहे की, कोणाकोणाचे पाकिस्तानमध्ये अकाउंट आहेत, त्यांचा डाटा मिळवून संबंधितांची कुंडली समोर आणावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. वृत्तसंस्था