संग्रहित छायाचित्र
मुंबई लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत तब्बल ३० जागा मिळवल्या. यामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे १३ जागा मिळाल्या आहेत. सांगलीचे विशाल पाटील सहयोगी सदस्य झाल्याने त्यांची संख्या १४ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मोठा भाऊ ठरला असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. या सूचक विधानाद्वारे राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. तसेच विधानसभेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कसा असेल? या संदर्भातही सूचक भाष्य केलं आहे. थोडक्यात महाराष्ट्र विकास आघाडीत भावकी सुरू झाल्याचे म्हणता येईल.
राऊत म्हणाले, कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही
महाराष्ट्रात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्या आहेत. काँग्रेससमोर तसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होतं. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असं ठरलं आहे. पटोले म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते. आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं.
पटोलेंच्या बॅनरबाजीची चर्चा
काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. आता महाविकास आघाडीचे विधानसभेकडे लक्ष लागले आहे. याबाबत जी जागा जो जिंकेल, ती त्याची असं म्हणत सूचक विधान राऊतांनी केलं आहे.