‘पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती मैदानी चाचण्यांना स्थगिती’
मुंबई : राज्यात १९ जूनपासून सर्वत्र पोलीस भरती सुरू झालेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात १७ हजार ४७१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रकियेसाठी सध्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. पावसामुळे पोलीस भरतीच्या चाचणीसाठी मैदाने सुस्थितीत राहिलेली नाहीत. अनेक ठिकाणी चिखल झाल्याने आणि मैदान ओलसर असल्याने उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचं काही उमेदवारांचं म्हणणं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून ‘ज्या ठिकाणी पाऊस आहे, अशा ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जेथे पाऊस आहे, तेथील उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता यापुढे अजून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या आणखी पुढे जाऊ शकतात. त्यामुळे अनेक उमेदवारांसाठी शेवटची संधी असेल तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, अशा उमेदवारांना संधी मिळायला हवी. त्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. पोलीस भरती प्रक्रियेत पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असेल त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी घेण्यासाठी पुढील तारखा देण्यात आलेल्या आहेत. मात्र, जेथे पाऊस नाही तेथे भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी येत आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात काही सूचना केलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे आंदोलन
पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. पावसामुळे मैदानावर पाणी साचत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. अमरावतीत काही विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं होतं. तसेच पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. जेथे पाऊस आहे. त्या ठिकाणची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली असून तेथील उमेदवारांना पुढच्या तारखा देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.