शिर्डी लोकसभा मतदारसंघ: सेना एके सेना!

मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघाने आपली परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन गटातच निवडणूक होऊन ठाकरे शिवसेनेने बाजी मारली. या मतदारसंघाचा २००९ पासूनचा इतिहास पाहिला तर उमेदवार कोणीही असो निवडून येतो तो शिवसेनेचाच उमेदवार.

Political News

संग्रहित छायाचित्र

शिर्डी मतदारसंघात उमेदवार कोणीही असो आणि कोणाचीही यंत्रणा असो शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार हे समीकरण २००९ पासून कायम असून आता झालेल्या निवडणुकीतही चित्र तेच राहिले.

मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघाने आपली परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन गटातच निवडणूक होऊन ठाकरे शिवसेनेने बाजी मारली. या मतदारसंघाचा २००९ पासूनचा इतिहास पाहिला तर उमेदवार कोणीही असो निवडून येतो तो शिवसेनेचाच उमेदवार. २००९ ला पहिल्यांदा जेव्हा निवडणूक झाली, त्यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवताना ३ लाख ५९ हजार मते मिळवली होती. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने जागावाटपात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रामदास आठवले यांना ही जागा सोडली होती. त्यांना २ लाख २७ हजार तर अपक्ष प्रेमानंद रुपवते यांना २२ हजारांच्या आसपास मते पडली होती. 

२०१४ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले तेव्हा त्यांना ५ लाख ३२ हजार मते पडली होती. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३३ हजार मते पडली होती. २०१९ ला पुन्हा एकदा शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी विजय  मिळवताना ४ लाख ८३ हजार मते मिळवली होती तर काँग्रेसकडून मैदानात उतरलेले भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६४ हजार मते पडली होती. २०२२ ला शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे २०२४ ला लोखंडे शिंदे शिवसेनेकडून तर ठाकरे सेनेकडून काँग्रेसची कास सोडून आलेले भाऊसाहेब वाकचौरे मैदानात होते. वाकचौरेंना ४ लाख ७६ हजार तर लोखंडेंना ४ लाख २६ हजार मते  मिळाली होती. या मतदारसंघात ठाकरे सेनेला अपशकुन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवतेंना मैदानात उतरवले होते. त्यांनी ९० हजारांच्या आसपास मते मिळवली होती. एकूणच या मतदारसंघावर २००९ पासून शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवले असून विविध वेळी ५० हजार ते दोन लाखांच्या आघाडीने विजय  मिळवला आहे.    

समसमान बलाबल 
शिर्डी मतदारसंघातील राजकीय बलाबलावर नजर टाकली तर अकोलेमध्ये डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी-अजित पवार गट), संगमनेरमध्ये  बाळासाहेब थोरात  (काँग्रेस), शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे (भाजप), कोपरगावमध्ये आशुतोष काळे (राष्ट्रवादी-अजित पवार गट), श्रीरामपूरमध्ये लहू कानडे (काँग्रेस) आणि नेवासामध्ये शंकराराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष) असे चित्र आहे. संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासातील आमदारांनी महाविकास आघाडीसाठी तर शिर्डी, अकोले, कोपरगावच्या आमदारांनी महायुतीच्या सदाशिव लोखंडेसाठी काम केले असावे. त्यातच उत्कर्षा रुपवतेंनी लाखाच्या आसपास मते मिळवल्याने वाकचौरे आणि लोखंडे यांच्यातील विजयी मतांचे अंतर कमी झाले. सहकारी साखर कारखानदारी आणि राजकारणाबाबतची नागरिकांतील कमालीची सक्रियता या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक अत्यंत चुरशीने लढवली जाते. लोकसभा निवडणुकीतही ही स्पर्धा, चुरस दिसून आली आणि मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लावल्याचे दिसून आले.

विखेंचे वर्चस्व 
२००९ पूर्वी हा मतदारसंघ कोपरगाव नावाने अस्तित्वात होता. त्या मतदारसंघावर बाळासाहेब विखे यांचे एवढे एकहाती वर्चस्व होते की ते सलग सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. यातील सहा वेळा काँग्रेसकडून तर एका वेळी शिवसेनेकडून ते खासदार झाले होते. याच काळात ते शिवसेनेकडून केंद्रात अर्थ राज्यमंत्रीही झाले होते. विखे आणि थोरात या घराण्यांचे कार्यक्षेत्र शिर्डी मतदारसंघात येत असले तरी हा मतदारसंघ राखीव असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. मात्र, आपली सारी ताकद उमेदवारांच्या मागे लावत निवडणूक लढवावी लागते. काहीही असले आणि कोणीही असले तरी हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे. पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ विखेंच्या ताकदीमुळे तर सध्याचा शिर्डी मतदारसंघ हा सेनेच्या वर्चस्वामुळे आणि धार्मिक तीर्थस्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या लौकिकामुळे ओळखला जातो.       

विखे-थोरात वैर 
जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी विखे आणि थोरात या दोन राजकीय घराण्यांत  परंपरागत स्पर्धा दिसते. या घराण्याबरोबर कोपरगाव भागात कोल्हे आणि काळे अशा दोन घराण्यांमध्येही पूर्वीपासून स्पर्धा आहे. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आठवले गटाची आघाडी होती. त्यावेळी शिर्डी राखीव मतदारसंघ आठवले यांच्यासाठी सोडला होता. यावेळी विखे आणि पवार घराण्यातील पूर्वपरंपरागत वैर उफाळून आले. ऐनवेळी नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवारांनी उमेदवार दिला. यामुळे बाळासाहेब विखेंची अडचण झाल्याने त्यांनी शिर्डीमध्ये  आघाडीच्या आठवलेविरोधात आपली यंत्रणा राबवली. पवार- विखे वादात शिर्डीत आठवले पराभूत झाले आणि शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. हेच वाकचौरे २०१४ ला काँग्रेसमध्ये गेले आणि पराभूत झाले. २०२४ मध्ये काँग्रेसची साथ सोडून यावेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे वाकचौरे पुन्हा दिल्लीत पोहोचले आहेत. एकंदरीत उमेदवार कोणीही असला तरी शिवेसना विजयी होणार हे समीकरण येथे पक्के झालेले आहे, असे म्हणावे लागेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest