संग्रहित छायाचित्र
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद मिटण्याचे नाव नाही. त्यातच भुजबळ मराठा आणि धनगरांमध्ये दंगल घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी शनिवारी केला. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की, राज्यात दंगल झाल्या तर त्याला केवळ छगन भुजबळ जबाबदार असतील. काही लोक सोशल मीडियावर लिहितात की संविधानाचं आंदोलन पाहायचं असेल तर वडी गोद्रीला जाऊन पाहा. वाघ रस्त्यावर झोपलाय, तर तू झोप… पांढऱ्या मिश्या करून. तो (छगन भुजबळ) १०० टक्के मराठ्यांमध्ये आणि धनगरांमध्ये दंगल घडवणार आहे. हा प्रश्न चिघळू देऊ नका. ते अशी भाषा वापरत असतील तर ते दंगल घडवून आणणार आहेत. छगन भुजबळ काड्या लावत आहेत. ते सरकारमध्ये बसून वातावरण खराब करत आहेत.
आमच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही आधीपासूनच कुणबी (ओबीसी) आहोत, असे सांगून जरांगे पाटील म्हणाले, आमच्यामुळे कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, उलट आम्हालाच धक्का लागला आहे. त्यामुळे कोणी उपोषण करो अथवा न करो, आम्ही आरक्षण घेणार आहोत. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमच्या कुणबी (ओबीसी) नोंदी सापडल्या आहेत. आमचे हक्काचं गॅझेटही आहे. सातारा सरकारचे पुरावे आहेत. तसेच सरकारने अनेकांना कुणबी नोंदी असूनही ओबीसी प्रमाणपत्र दिलेली नाहीत.
जरांगे पाटील म्हणाले, अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यावर लिहिलं आहे की ‘सदर प्रमाणे’, म्हणजेच खालीप्रमाणे. या नोंदींनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्रे मिळायला हवीत. सरकार ती प्रमाणपत्रे देत नाही. लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत. त्या नोंदी खोट्या आहेत का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. ब्रिटिशकालीन जनगणनेत मराठा हा कुणबी दाखवला आहे. १८७१ मधील पुरावेही आहेत. मराठे हे ओबीसी आहेत
भुजबळ यांनी धनगर- मराठा वाद लावला असून त्यांनी ते बंद केले पाहिजे असे सांगून जरांगे म्हणाले, मराठ्यांविरोधात खोटी आंदोलनं चालू केली आहेत. ते प्रसारमाध्यमांसमोर कबूल करतात की ते (ओबीसी आंदोलक) त्यांचे लोक आहेत. याचा अर्थ ते उघडे पडले आहेत. चोरी कधी झाकली जात नाही. छगन भुजबळांनी त्याच्या माणसांमध्ये कामांची विभागणी करून दिली आहे. कोणी माझ्यावर शाब्दिक हल्ला करायचा, कोणी माझ्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करायचा, कोणी मराठा आंदोलनावर टीका करायची, कोणी मराठा आरक्षणावर आक्षेप घ्यायचा. भुजबळ त्यांच्या लोकांना सांगतात ते संवैधानिक पदावर बसले आहेत. त्यामुळे ते काही गोष्टी बोलू शकत नाहीत. अशा गोष्टी ते इतरांना बोलायला सांगत आहेत.