एमपीएससीचा घोळ मिटेना; लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीत पुन्हा घातळा गोंधळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट क सेवा परीक्षा २०२३ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Clerical Typing Skills Test

संग्रहित छायाचित्र

निवडलेल्या भाषेऐवजी वेगळ्याच भाषेची चाचणी देण्याची सक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट क सेवा परीक्षा २०२३ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एमपीएससीने गोंधळ घातला असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. इंग्रजी भाषेतील टायपिंग प्रमाणपत्र असतानादेखील मराठी टायपिंग परीक्षेच्या यादीत नाव आल्याने विद्यार्थी तणावात आले आहेत. त्यामुळे अगदी परीक्षेच्या तोंडावर मराठी टायपिंग कसे करावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 

महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा २०२३ या परीक्षेसाठी लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी (Clerical Typing Skills Test) जुलै महिन्यात घेतली जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर थेट अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र या परीक्षेच्या भरती प्रक्रियेत एमपीएससीने गोंधळ घातल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मराठीतून टंकलेकन कौशल्य चाचणी देण्याचा पर्याय निवडला, त्यांचे नाव इंग्रजीत घेण्यात येणाऱ्या चाचणीच्या यादीत आले आहे. दुसरीकडे, इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना मराठीतून टंकलेखन चाचणी देण्याचा निर्णय एमपीएससीने पूर्वी घेतला होता. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा सराव केला. मात्र, नंतर एमपीएससीने पुन्हा यात बदल केला आणि ज्या भाषेचे टायपिंग प्रमाणपत्र आहे, त्याच भाषेतून टंकलेखन चाचणी द्यावी लागेल, असे जाहीर केले. त्यामुळे या परीक्षेस बसलेले विद्यार्थी तणावाखाली आहेत. एमपीएससीने ही तांत्रिक अडचणी दूर करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केली.

एका विद्यार्थिनीकडे मराठी भाषेचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे तिने मराठी भाषेत टंकलेकन कौशल्य चाचणी देण्याचा पर्याय निवडला होता. मात्र तिचे नाव इंग्रजी भाषेत घेण्यात येणाऱ्या चाचणीच्या यादीत आले आहे. त्यामुळे तिला आता इंग्रजी भाषेतच चाचणी देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मराठीचा सराव असताना इंग्रजी टायपिंग करणे आता परीक्षेच्या तोंडावर शक्य नाही, ही बाब  तिने एमपीएससीच्या निर्देशनास आणून दिली आहे. मात्र कोणताही प्रतिसाद एमपीएससीने दिला नाही.
यानंतर सदर तरुणीने तिने थेट एमपीएससीच्या मुंबईतील कार्यालयाकडे धाव घेतली. कार्यालयात गेल्यानंतर तिला आत जाण्यापासून रोखण्यात येत होते. विनंती केल्यानंतर आत सोडण्यात आले. मात्र स्वागत कक्षात दोन तास बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर एमपीएससीचे जनसंपर्क अधिकारी असल्याचे एका व्यक्तीने सांगून तिच्याशी संवाद साधला. मात्र आता ज्या यादीत नाव आले, तीच परीक्षा द्यावी लागेल असे सांगण्यात आले. परंतु एमपीएससीने चूक मान्य केली नाही. तसेच एमपीएससीने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता, फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनेदेखील एमपीएससीने जाहीर केलेल्या यादीत जी भाषा नमूद आहे, त्याच भाषेतून चाचणी द्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते.

पुन्हा सुधारित यादी जाहीर करण्याची मागणी
दरम्यान, एमपीएससीने टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत तीन वेळा प्रसिद्धीपत्रक जाहीर केल्याने गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रानुसार पुन्हा सुधारित यादी जाहीर करावी, तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असे आता विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एमपीएससीकडे ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र असल्याचे नमूद केले होते. त्या विद्यार्थ्यांना मराठीतून टंकलेखन चाचणी देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला होता. त्यानंतर यादीही प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील चाचणीसाठी निवडण्यात आले. त्यामुळे इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या टंकलेखन चाचणीचा सराव केला. परंतु एमपीएससीने पुन्हा त्यात बदल करून नव्याने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आणि ज्या भाषेचे टायपिंग प्रमाणपत्र आहे, त्याच भाषेतून टंकलेखन चाचणी द्यावी लागणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. एमपीएससीने योग्य निर्णय घेऊन हा गोंधळ निस्तरावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.  

विद्यार्थी म्हणतात...
एमपीएससीने टायपिंगचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर भाषा निवडण्याचा पर्याय दिला होता. इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिला होता. मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र असले तरी टंकलेखन चाचणी देण्यासाठी इंग्रजी पर्याय निवडता येत होता. तसेच इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र असले तरी टंकलेखन चाचणीसाठी मराठी भाषेचा पर्याय निवडता येण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच दोन्ही प्रमाणपत्र आहे पण संबंधित विद्यार्थ्याने दोन्ही पर्याय निवडले नसतील आणि त्याच्या समोर शून्य असे दाखवत असेल तर त्याला इंग्रजी भाषेतून टंकलेखन चाचणी देता येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले होते. तसेच एमपीएससीच्या हेल्पलाईनवरून देखील विद्यार्थ्यांना अशी माहिती दिली जात होती. आता मात्र एमपीएससीने सातत्याने नियमात बदल केल्याने विद्यार्थी त्रासले आहेत. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा सुधारित याद्या लावून मराठी की इंग्रजी भाषेबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

एमपीएससीने सातत्याने भरती प्रक्रियेचे नियम सोयीनुसार वापरण्याचे धोरण ठेवले आहे. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना नियमांचा अर्थ कळत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.  या परीक्षेत पहिल्यापासूनच गोंधळ घातला जात आहे. एमपीएससीने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाणार आहे. त्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा निर्णय घेऊ नये.
- एक विद्यार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest