छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा हात
#छत्रपती संभाजीनगर
रामनवमीच्या काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीमागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बडा नेता असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रविवारी (दि. २) केला.
डॉ. बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राष्ट्रवादीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या अगोदर दंगल घडवल्याचा दावा त्यांनी केला. डाॅ बोंडे म्हणाले, ‘‘ खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. यातूनच छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याची फूस होती.’’
राज्यसभेतील भाजपचे खासदार असलेल्या डाॅ. बोंडे यांनी केलेल्या विधानांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ‘‘खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन यांचे भांडण झाले. जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते. त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लीम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आणि हा हिंसाचार घडला. या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजे. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती, याचा शोध घेतला पाहिजे,’’ अशा शब्दांत डाॅ. बोंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत शंका उपस्थित केली. दंगलीच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. राम मंदिरासमोरच आधी दोन गट भिडले. मात्र त्यांच्या बचावासाठी समोर आलेल्या पोलिसांनाच एका गटाने टार्गेट करून त्यांच्यावर दगडफेक केली. यानंतर वातावरण चिघळले. समाजकंटकांनी पेट्रोलचे कापडी बोळे करून त्याला आग लावून पोलिसांची १४ वाहने पेटवून दिली. दगडफेकीत १७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. अधिकची कुमक येताच पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. तरीही जमाव नियंत्रणात येत नसल्याने हवेत गोळीबार करण्यात आला.