आमदाराची आई विकतेय बांबूच्या टोपल्या
#चंद्रपूर
चंद्रपूर शहरात सध्या महाकालीची यात्रा सुरू आहे. या यात्रेत रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणारी एक वृद्ध महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही वृद्ध महिला कोणी सामान्य नसून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या त्या आई आहेत.
गंगुबाई जोरगेवार वयाच्या ८० व्या वर्षीदेखील सक्रिय आहेत. परिसरात त्यांना ‘अम्मा’ या नावाने आळखले जाते. मुलगा आमदार झाल्यावर घरी बसून निवांत आयुष्य जगणे त्यांना सहज शक्य होते. मात्र, दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी दिलेला श्रमप्रतिष्ठेचा मंत्र त्या आयुष्याच्या संध्याकाळीदेखील जपत आहेत.
बाबा आमटे यांनी ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हा नारा दिला होता. अम्मा आजदेखील हे तत्त्व पाळत आहेत. मुलगा आमदार असूनही यात खंड पडलेला नाही. वार्धक्य आले तरी आपला व्यवसाय नेटाने चालविणाऱ्या अम्मा यंदाही देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय समर्थपणे करत आहेत.
चंद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गांधी चौकात वर्षभर रस्त्याच्या कडेला बसून ताटवे, टोपल्या अशा बांबूच्या वस्तू अम्मा विकतात. महाकालीच्या यात्रेदरम्यान चांगली विक्री होते म्हणून यात्रेतदेखील न चुकता आपला व्यवसाय थाटतात. ग्राहकांशी तीच घासाघीस, तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्या आनंद शोधत आहेत.
किशोर जोरगेवार २०१९ मध्ये आमदार झाले तेव्हाच ‘मी आपला व्यवसाय सोडणार नाही,’ असे अम्मांनी ठामपणे सांगितले होते. आमदार मुलानेदेखील आईच्या या निर्णयाचा मान ठेवला. काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले तेव्हापासून आमदार जोरगेवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हा वाकप्रचार फार प्रचलित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसाठी विरोधक सातत्याने हा शब्द वापरतात. जोरगेवार यांचे विरोधक, त्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, पण आईच्या कष्टाचा दाखला देत त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
वृत्तसंस्था