लाखमोलाची गाढवं !
#पाथर्डी
मढी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच संपला. यावेळी गाढवांना एक लाख रुपयांपर्यंत विक्रमी किंमत लाभली.
तीसगाव परिसरात हा बाजार पार पडला. त्यामुळे मढी येथील गाढवांच्या बाजारात मालाची टंचाई होऊन मोठी भाववाढ झाली. या वर्षीच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच पंजाबी गाढवे विक्रीसाठी आली. अत्यंत उंचीपुरी ताकदवान अगदी घोड्यासारखी दिसणारी पंजाबी गाढवे यात्रेकरूंचे खास आकर्षण ठरले. एक लाख रुपयांच्या घरात एक पंजाबी गाढव विकले गेले.
‘‘उत्तराखंड विशेषतः बद्रीनाथ केदारनाथ काश्मीरच्या परिसरात या गाढवांना खूप मागणी असते. लष्कराचे साहित्य डोंगराळ भागात अगदी सहजपणे वाहतूक करण्यासाठी याच गाढवांची मदत घेतली जाते. गाढवाची ही संकरित जात सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे,’’ अशी माहिती उत्तराखंडचे करीम पहाडी यांनी दिली.
मढी येथे भरणाऱ्या कानिफनाथांच्या यात्रेतील गाढवांचा बाजार आपल्या तसेच आजूबाजूच्या राज्यांत प्रसिद्ध आहे. हजारो नाथ भक्त या ठिकाणी एकत्र येतात. मढी येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच तीसगाव परिसरात भरला होता. त्यामुळे मढी येथील गाढवांच्या बाजारात मालाची टंचाई होऊन मोठी भाववाढ झाली. राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी व्यापारी येतात. पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. वृत्तसंस्था