मला तर दारूवाली बाई म्हणून हिणवले होते
#बीड
गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील फडतूस-काडतूसवरून तापलेले राजकीय वातावरण आता दारुवाली या टीकेकडे गेले आहे. फडतूस-काडतूस वादावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी माझ्यावर तर दारूवाली बाई म्हणून विरोधकांनी टीका केली होती, अशी खंत व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, राजकारण हा काटेरी रस्ता आहे. राजकारणात सिंहासनही काटेरीच असते. त्यामुळे राजकारणात टीका होतच राहणार. कधी कधी टीका अत्यंत खालच्या पातळीवरही केल्या जातील. मला विश्वास आहे की, टीकेमुळे फडणवीस व्यथित होणार नाही. ते त्यांचे काम नेहमीप्रमाणे व्यवस्थित करतील.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मीसुद्धा राजकारणात अनेक टीकांना सामोरी गेली आहे. माझा डिस्टिलरी प्लान्ट आहे. त्यामुळे काही विरोधी पक्षातील नेत्यांनी माझ्यावर दारुवाली बाई अशा शब्दांत टिप्पणी केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली, माझे प्रचंड ट्रोलिंग झाले. रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले. माझे फोटो लावून काही पाकिटे वाटली. मला अपमानित केले गेले असे सांगून त्या म्हणाल्या की, राजकारणात केवळ फुलेच वाट्याला येणार नाहीत. टीकाही वाट्याला येईल. अनेकदा खालच्या पातळीवरची टीका वाट्याला येईल. मला विश्वास आहे की, फडणवीस या टीकेमुळे व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील. या सर्व गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत. कोणीही असं करू नये असे वाटते, परंतु ते होत राहील.
बीडमध्ये आज भाजपच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राहूल गांधी व अन्य काँग्रेस नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून माझ्या सूचनेनुसार आज परळी शहरात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा जल्लोषपूर्ण वातावरणात
काढण्यात आली.वृत्तसंस्था