गडकरींच्या कार्यालयात पुन्हा आला धमकीचा फोन
#नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ माजली आहे. धमकीमुळे पोलिसांनी कार्यालय, निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरू केला आहे. दोन महिन्यात दुसऱ्यांदा गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास धमकीचा पहिला कॉल आला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जनसंपर्क कार्यालयाला भेट देत माहिती घेतली. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जी-२० परिषदेचा समारोप आहे. गडकरी यांच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षाविषयक विशेष काळजी घेतली जात आहे. एटीएसच्या पथकानेही कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे दोन कॉल आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
यापूर्वी १४ जानेवारी २०२३ रोजी गडकरी यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने दोन वेळा लॅण्डलाईनवरून फोन करून धमकी दिली. तब्बल चारदा कॉल करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. अज्ञात व्यक्तीने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिली होती. धमकी देणाऱ्याने १०० कोटींची खंडणीही मागितली होती.