संग्रहित छायाचित्र
भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन झाले. फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा परिस्थितीत त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर ड्रायव्हर म्हणून काम केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर पाटील यांनी मराठवाड्यात शिवसेनेचे काम सुरु केले. त्यांनी भूम परांडा वाशी मतदासंघांचे 1995 ते 2004 पर्यंत नेतृत्व केले. 1995 व 1999 ला त्यांनी सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती.
गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानेश्वर पाटील हे दीर्घ आजारांमुळं पुण्यात उपचार घेत होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. धारशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असूनही पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. अशात आता पाटील यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.