आदित्य यांच्या लग्नासाठी फडणवीस सरसावले
#मुंबई
विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी यावरून जोरदार खडाजंगी उडाली. सभागृहातील वादाने गढुळलेल्या वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी चक्क आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा बार उडवायला सरकार तयार असल्याचे सांगत कोपरखळी मारली. यामुळे सभागृहातील तणावाचे वातावरण दूर होऊन अक्षरशः हास्याचे फवारे उडाले.
आमदार बच्चू कडू यांनी कामगारांच्या लग्नावरून सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. कामगारांचा प्रश्न मांडत असताना म्हणाले कडू की राज्यभरात २५ ते ३० टक्के प्रकल्प बंद होतात. त्यामुळे कामगार रस्त्यावर येतात. हे होऊ नये म्हणून आपण काही धोरण आखलं पाहिजे की नाही? एखादा मोठा प्रकल्प होतो तेव्हा कामगार गाव सोडून येतात. प्रकल्प बंद पडल्यावर तो कामगार कुटुंबासह रस्त्यावर येतो. लग्न कामगार आहे म्हणून केले. आता नोकरी गेल्यावर लग्न तुटलं याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न बच्चू कडूंनी विचारला. आता याची सरकारने जबाबदारी घ्यावी असंही कडू म्हणाले.
यावर फडणवीस म्हणाले की, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आणि तुटले तर सांभाळायची जबाबदारी सरकारची असे कोणी म्हणत असेल तर ही सूचना तपासून पाहू. बच्चू कडू यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंकडे पाहून तर हा विषय काढला नाही ना, असा सवाल उपस्थित केला. सरकारने लग्न लावायचे असेल तर सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे म्हणताच सर्वांनी सभागृहात बाक वाजविण्यास सुरुवात केली.
फडणवीसांनी केलेल्या टिपण्णीवर आदित्य ठाकरेंनी मिश्किल टिपण्णी केली. ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा, असा चिमटा काढला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आदित्य ठाकरेंना चिमटा घेत आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचे असे म्हटले जाते. यानंतर फडणवीस यांनी कुणाचेही तोंड बंद करायचा लग्न हा उत्तम उपाय, हे मी अनुभवातून बोलतोय असे सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
संजय राऊतांवर टीका करताना मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख केला. त्याचे जोरदार पडसाद अधिवेशनात उमटले. विधानसभेत याआधीच मंत्री दादा भुसे आणि अजित पवार यांच्यात वाद रंगला होता.
मंत्री दादा भुसे यांनी गिरणा ॲग्रो कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांकडून तब्बल १७५ कोटी गोळा केले. मात्र, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स ४७ सभासदांच्या नावावर दाखवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, संजय राऊत हे महागद्दार आहेत. भाकरी मातोश्रीची खातात, मात्र चाकरी शरद पवारांची करतात. मी रुपयाचाही भ्रष्टाचार केला असे सिद्ध झाले तर आमदारकी, मंत्रिपदाचा राजीनामा देईन. संजय राऊत यांनी माफी मागायला हवी.
भुसेंनी शरद पवारांचे नाव घेताच अजित पवार संतापले. अजित पवार म्हणाले, मंत्री दादा भुसे यांनी शरद पवारांचे नाव घेण्याचे कोणतेच कारण नव्हते. नरेंद्र मोदीदेखील शरद पवारांविषयी आदर व्यक्त करतात. अशावेळी दादा भुसे शरद पवारांवर टीका करतील, अशी अपेक्षा नव्हती. दादा भुसेंनी आपले शब्द मागे घ्यावे आणि दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा सभात्याग करावा लागेल.