विस्तार करा नाहीतर आमदार पळून जातील...
#अहमदनगर
मुख्यमंत्री एकनाथराव त्यांच्या प्रत्येक आमदाराला तुला मंत्री करू, असे सांगत आशेला लावत आहेत. असे कितीजणांना आशेला लावले आहे, ठावूक नाही. पण एवढे मात्र खरे आता जर त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही केला तर त्यांचे बहुतांश आमदार पळून जातील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला टोला लगावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर फटकेबाजी केली आणि उपस्थितांना खळखळून हसवले.
शिंदे-फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरताना पवार म्हणाले, अवकाळी पावसाने राज्याचे वाटोळे केले आहे. निसर्ग कधी कोपेल हे सांगता येत नाही, अशा वेळी आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला पाहिजे. याबद्दल तर हे लोक बोलायला तयार नाहीत. अशा पद्धतीचे सरकार आज सत्तेत आलेले आहे.
त्यांना याबाबत विचारले असता ते फक्त म्हणतात आम्ही करू, आम्ही देऊ, काही काळजी करू नका. परंतू तशा पद्धतीचा निर्णय काही होत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला मंत्रिपद देऊ, असे सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर आहेत ते आमदारही निघून जातील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. वृत्तसंस्था