उद्धव यांच्या निशाण्यावर निवडणूक आयोग
#खेड
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात प्रथमच आलेल्या उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेनेची स्थापना आयोगाच्या वडिलांनी केली नाही, तर माझ्या वडिलांनी केल्याचे खडे बोल त्यांनी खेड येथील जाहीर सभेत सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढविला. शिवसेनेशी हात मिळवण्यापूर्वी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला गल्लीतील कुत्रंही विचारत नव्हते, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “ विशेष करून निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतिबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे. आयोगाने तत्त्वानुसार निर्णय घेतला असता तर शिवसेना शिंदे गटाची आहे हे त्यांनी सांगितलेच नसते. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित दिल्लीत वर त्यांचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही. शिवसेना तोडणारी माणसे मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या एकजुटीवर हल्ला करत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी आपले सारे आयुष्य वेचले. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. हे फोडाफोडी करणारे आज मोठे झाले असले तरी त्यांना एकेकाळी गल्लीतील कुत्रंही विचारत नव्हते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना साथ दिली नसती तर ते आज महाराष्ट्रात दिसले नसते. मात्र, हे आज खुनशीपणाने वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच ते संपवत आहेत. त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तर तेच संपतील. सभेत आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचा समाचार घेताना शिंदे सरकारवर घणाघात केला. विधानसभेत मला चारही बाजूनं घेरण्याचं काम सुरू आहे. मला बोलू दिलं जात नाही, पण माझा आवाज बंद करण्याची तुमच्या बापाची हिंमत नाही. तुम्ही जनतेचे सरकार म्हणता, ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेले पैसे तुम्ही रोखले. हेच का तुमचं ‘सबका साथ सबका विकास.’ बोलायचं फक्त, पण तसं करायचं नाही.”
वृत्तसंंस्था