संग्रहित छायाचित्र
बारामती विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका-पुतण्यात थेट लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळून १ लाख ८९९ मतांनी त्यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना ८० हजार २३२ मते मिळाली.
एकूणच निवडणुकीआधी वातावरणाच्या विपरीत ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे बघायला मिळाले. संपूर्ण पवार कुटुंब या निवडणुकीत उतरले. सगळ्या पवारांनी घरोघरी जावून प्रचार केला. अगदी प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत बारामतीत सभा, मेळावे सुरू होते. ही निवडणूक जितकी राजकीय होती तितकीच कौटुंबिक देखील होती. या निवडणुकीत अजित पवार यांनी बाजी मारली आणि पुतण्याच्या पराभव त्यांनी केला.
लोकशाहीत मतदार राजा असतो. त्यांच्या मताचा आदर केला जाणे अपेक्षित असते. निवडून येणारा उमेदवार विरोधात मतदान करणाऱ्यांचा देखील प्रतिनिधी असतो. संख्येने अल्प असले तरी आपले मत ऐकून घेतले जाण्याचा त्याच्यावर विचार होण्याचा हक्क सर्व मतदार नागरिकांना आहे. बारामती मधील अशाच ९४ मतदारांची चर्चा सध्या सुरू आहे. या मतदारांना दोन्ही पवारांपेक्षा एक वेगळा चेहरा बारामतीमध्ये असावा असे वाटले. हा उमेदवार महाराष्ट्र अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या इतकाच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभर त्यांचे चाहते देखील आहे. हा उमेदवार म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून अभिजीत बिचुकले हे होय.
डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून यंदा विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली. नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बिचुकले यांनी या आधी देखील अनेक वेळा निवडणुका लढवल्या आहेत. यंदा त्यांनी बारामतीमधून नशीब आजमावले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या पदरी अपयश पडले. मात्र प्रयत्नवादी असणाऱ्या बिचुकले यांची ही शेवटची निवडूक नक्कीच नसणार अशी आशा लोक करत आहेत. अशातच चर्चा आहे 'त्या' ९४ मतदारांची. ज्यांनी बिचुकले यांना मत देवून त्यांच्यावर विश्वास दाखवला. हे मतदार कोण असावेत असे कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झाले आहे. सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे.