शरद पवारांच्या निर्णयामुळे अजितदादांच्याही मनाला वेदना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. तसेच यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, पुढील तीन वर्षच मी राजकारणात राहणार आहे, असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.
मात्र, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पवारसाहेब निवृत्तीची घोषणा मागे, अशी भावनिक साद घालताना दिसत आहेत. याबाबत पुण्यातील कार्यकर्ते बोलताना म्हणाले की, “ज्या नावाशिवाय महाराष्ट्राचे राजकारण शून्य ते नाव म्हणजे शरद पवार. आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांनी शरद पवारांचे राजकारण याची देही याची डोळा अनुभवले आहे. परंतु आज शरद पवार यांनी मुंबई येथे "लोक माझे सांगाती" या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी एक असा निर्णय घेतला.”
“शरद पवारांच्या बोटाला धरून आणि मार्गदर्शनासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. त्यामुळे अजित पवार यांना आमची हात जोडून विनंती आहे की, दादांनी पवार साहेबांना निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला सांगावा, पवारसाहेब, तुम्हीच पुन्हा अध्यक्ष म्हणून राहावे, खरेतर साहेबांच्या निर्णयामुळे अजित पवारांच्या मनात देखील वेदना होत असतील, या वेदना आम्ही समजू शकतो, त्यांना आमची एकच विनंती आहे, त्यांनी साहेबांना सांगून निर्णय मागे घ्यायला सांगावा”, असे म्हणत कार्यकर्ते भावून झाल्याचे पाहायला मिळाले.