जनाची नाही, मनाची तरी लाज ठेवा
सीविक मिरर ब्यूरो
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन अवघे तीन दिवस झाले. मात्र, त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत काही घटकांकडून वक्तव्ये करण्यात येत आहेत. यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी (दि. ३१) चांगलेच संतापले. ‘‘जनाची नाही, किमान मनाची तरी लाज बाळगा,’’ असे त्यांनी पोटनिवडणुकीची चर्चा करणाऱ्यांना सुनावले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता अजित पवार म्हणाले, कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. खासदार
गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवसच झाले आहेत. एवढी काय घाई आहे? काही माणुसकी आहे की नाही? महाराष्ट्राची काही परंपरा आहे की नाही? लोक म्हणतील
यांना थोडी तरी जनाची मनाची लाज आहे की नाही?
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी गौरव यात्रा का काढावीशी वाटली नाही, असा सवाल
पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. ‘‘राष्ट्रीय महापुरुषांबाबत आदर राखायला हवा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचे काम भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते यांनी केले होते. त्यावेळी सातत्याने अशी वक्तव्ये होत होती. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी आता सावरकर गौरव यात्रा काढत असतील,’’ असेही
पवार म्हणाले. वृत्तसंस्था