अदानीप्रकरणी महाविकास आघाडीत मतभेद
# मुंबई
उद्योगपती गौतम अदानी यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यात यावी, या मागणीवरून राज्यातील महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसीला विरोध केला असून हा विषय लावून धरणारी काॅंग्रेस मात्र, जेपीसीद्वारे अदानी यांची चौकशी करण्याच्या मागणीवर ठाम आहे. ठाकरे गटानेही जेपीसीची मागणी कायम ठेवली आहे.
हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्याचबरोबर काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून अदानी यांच्या कंपन्यांना देण्यात येणारे झुकते माप तसेच नियमबाह्य सहकार्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी त्यांनी केलेल्या जेपीसीच्या मागणीला बहुतेक विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. यामुळे सरकारची बऱ्यापैकी कोंडी झाली. सरकारने जेपीसीची मागणी मान्य केलेली नाही. राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष नव्या जोमाने ही मागणी ठामपणे लावून धरत असतानाच राज्यातील महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे एका मुलाखतीत शुक्रवारी (दि. ७) नमूद केले. या विषयावरून मविआत मतभेदाची चर्चा सुरू होताच काॅंग्रेसने आपण अद्यापही जेपीसीच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर ठाकरे गटानेही विरोधी पक्षांची मागणी रास्त असल्याचे सांगत जेपीसीच्या मागणीला समर्थन कायम असल्याचे
जाहीर केले.
शरद पवार यांनी अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. अशोक चव्हाण यांनी जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपण जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अदानी प्रकरणावरून महाविकास आघाडीतील काॅंग्रेस-शिवसेना ठाकरे गट एका बाजूला तर राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना पवार यांनी वेगळी भूमिका मांडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण या विषयावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘‘जेपीसीद्वारे अदानी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, ही मागणी देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी केलेली आहे. कदाचित शरद पवार यांचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. परंतु प्रकरण खूप गंभीर असल्याने जेपीसी झाल्याशिवाय ते बाहेर येणार नाही. ’’
‘‘महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडूनच मिळते. मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान मान्य करावे लागेल. पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जायची. मात्र, नंतर टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल,’’ असे पवार मुलाखतीत म्हणाले होते.वृत्तसंस्था