दीपाली सय्यदचे पाकिस्तानशी संबंध?
#अहमदनगर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्या तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा धक्कादायक दावा दीपाली यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी सोमवारी (दि. ३) केला. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत दीपाली यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध, त्यांचे आर्थिक हितसंबंध आणि त्याबाबत राज्य सरकारमधील जबाबदार नेत्यांची भूमिका यावर अनेक खुलासे करताना गंभीर आरोपदेखील केले. दीपाली यांनी पाकिस्तानचे नागरिकत्वदेखील स्वीकारले असल्याचा दावा शिंदे यांनी केला. 'दीपाली यांच्या पाकिस्तान संबंधाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही," असा गंभीर आरोप करीत शिंदे यांनी फडणवीसांनाही टार्गेट केले.
दीपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा करतानाच दीपाली यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीरही आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला. दीपाली यांचे पाकिस्तानात बँक खाते असल्याचा दावादेखील भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. “दीपाली यांच्या पाकिस्तान कनेक्शनबाबत भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे,” असेही शिंदे यांनी सुनावले.
भाऊसाहेब शिंदे कार्य म्हणाले ? सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दीपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानमध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावादेखील त्यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
यासाठी दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने दीपाली यांना पाकिस्तानी नागरित्व मिळाले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दीपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावादेखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. “दीपाली सय्यद यांचे नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी आर्थिक संबंध आहेत. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही," असे शिंदे म्हणाले.
वृत्तसंस्था