कोविड पुन्हा हातपाय पसरतोय...
# मुंबई
सुमारे एक-दीड वर्षांपासून जवळपास निद्रिस्त असलेल्या जीवघेण्या कोविड आजाराने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८०३ रुग्ण आढळले असून या विषाणूच्या संसर्गामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले होते. कोविड संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर होता. इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा बऱ्यापैकी असल्याने महाराष्ट्रात कोविडचा उद्रेक होऊनही त्यावर लक्षणीयरित्या नियंत्रण मिळवण्यात आले होते. त्यानंतर आता देशपातळीवर या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. असे असताना या रोगाचा सामना करण्यास उपयुक्त ठरणारी कोविडरोधी लशीचा मात्र पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका या ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. नािशक महापािलकेतही मागील आठवड्यात लशीचा साठा संपला होता. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लस पुरवठा केव्हा होणार, असा सवाल त्यांच्याकडून लस केंद्रांवर सातत्याने विचारला जात आहे.
देशातही कोविड रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ६,०४९ रुग्ण आढळले. या काळात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांच्या संख्येनेही २८ हजाराचा आकडा पार केल्याने तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण केरळमध्ये आढळले. तेथे १९३६ जणांना कोविडची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील ३,९८७ च्या तुलनेत तेथे सक्रिय रुग्णांची संख्या ९,४२२ अशी लक्षणीय आहे. मात्र, केरळमध्ये २४ तासांत केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला.
कोविड रुग्णांची पुन्हा एकदा झपाट्याने संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. जुन्या टाळेबंदीच्या अनुभवाने अनेकांचा थरकाप उडतो आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक आणि इतरही अनेकजण लसीकरणासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांना लस संपल्याचे उत्तर मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे.
पुण्यासह इतर अनेक ठिकाणच्याही लशी संपल्यात. त्यात मुंबई, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये लस साठा संपला आहे. केंद्र सरकारकडून लशीचा साठा मिळत नसल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेकडे कोवॅक्सिनच्या २६० लशी होत्या. मात्र, त्याची मुदत ३१ मार्चला संपली. कोवॅक्सिन, कार्बोवॅक्स या लशींचा साठा शिल्लक नाही. कोवॅक्सिनचा साठा २४ मार्च, तर कोविशिल्डचा साठा हा १० फेब्रुवारी रोजीच संपला आहे.
वृत्तसंस्था