एकनाथ शिंदेंची तुलना शिवाजी महाराजांसोबत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे पोस्टर मुंबईत झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शनिवारी (दि. ११) मुख्यमंत्र्यांना फटकारले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:36 am
एकनाथ शिंदेंची तुलना शिवाजी महाराजांसोबत!

एकनाथ शिंदेंची तुलना शिवाजी महाराजांसोबत!

मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या संपर्क कार्यालयाजवळ लागलेल्या होर्डिंगमुळे नवा वाद, मनसे आमदाराची टीका

# मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणारे पोस्टर मुंबईत झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शनिवारी (दि. ११) मुख्यमंत्र्यांना फटकारले.

मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार असून मुंबईतील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरच हे पोस्टर लावण्यात आले आहे. यात एकनाथ शिंदे यांची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचे धाडस केल्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हावर शिंदे गटाचा हक्क असल्याचा निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची देहबोली कमालीची आक्रमक झाली आहे. विरोधकांना ते तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. यामुळे कार्यकर्ते जोशात असतानाच हा नवा वाद निर्माण झाला आहे.

 या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील कमालीचे आक्रमक झाले. एकनाथ शिंदे यांना फटकारताना ते म्हणाले, ‘‘शिवरायांसोबत अशी तुलना करणे सोडा. त्यांच्या नखाचीही कुणाला सर येणार नाही.’’

महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यावरून अनेकदा राजकीय वातावरण पेटवण्यात आले. यात वादग्रस्त ठरलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आघाडीवर होते. त्यांनी अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली. यामुळे विरोधी पक्षांनी अनेकदा आंदोलन करीत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. कोश्यारी गेल्यानंतर महापुरुषांची अवमानना  प्रकरण शमण्याच्या मार्गावर असतानाच हा नवा विवादास्पद प्रकार समोर आला आहे.

मुंबईत शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. खासदार असलेल्या मुख्यमंत्रिपुत्राच्या संपर्क कार्यालयासमोर एका पोस्टरवर एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. शिवाय पोस्टरच्या वर ‘३५०  वर्षांनंतर... पुन्हा तोच योग!’ असे ठळक अक्षरांत नमूद केले आहे. पोस्टरवर दोन दृश्य रेखाटलेली आहेत. एकात तुळजाभवानी माता ‘हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ या भवानी तलवारीने कर,’ असे म्हणत शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना दिसते.  

 दुसऱ्या दृश्यात बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देत आहेत.  त्यात पाठीमागे आनंद दिघे यांचेही चित्र आहे. या चित्रामध्ये शिंदे यांना उद्देशून बाळासाहेबांच्या तोंडी एक वाक्य टाकले आहे... ‘‘मला विश्वास आहे, आमचे प्रखर हिंदुत्वाचे विचार आणि भूमिका एकनाथा तूच पुढे नेऊ शकतोस. म्हणूनच श्रीरामाचे धनुष्यबाण तुझ्या हाती सुपूर्द करणे हा दैवी संकेतच आहे... यशस्वी भव!’’

जनाची नाही मनाची तरी चाड ठेवा...

मनसे आमदार राजू शिंदे यांनी या पोस्टरचा व्हीडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करत  तिखट शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ते म्हणाले, ‘‘कोणी स्वतःला 'जाणता राजा' म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा.’’ वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest