मुख्यमंत्री शिंदे यांची आता राज्यभर धनुष्यबाण यात्रा
#मुंबई
महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिंदे-फडणवीस सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी राज्यभर एकत्र सभा घेणार आहेत. त्याला २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेपासून प्रारंभ होत आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. २ एप्रिलच्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री राज्यभरात 'धनुष्यबाण यात्रा' काढणार आहे.
त्यातही विशेष म्हणजे 'धनुष्यबाण यात्रे'ची सुरुवातही छत्रपती संभाजीनगरमधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रेला सुरुवात होणार आहे. जेथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत तेथेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभा होत असल्याचा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता. विशेष म्हणजे असेच चित्र राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची 'धनुष्यबाण यात्रे'ची सभा होणार आहे.
संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असेल. उद्धव ठाकरे ज्या मराठवाडा संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत, त्यापेक्षा मोठ्या मैदानाचा शोध शिंदे गटाकडून घेण्यात येत होता. मात्र त्यापेक्षा मोठे मैदान नसल्याने अखेर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या
मैदानावर शिंदे यांची सभा होईल. तसेच महाविकास आघाडीचे तीन पक्ष आणि मी एकटा असे दाखवण्याचा प्रयत्न देखील शिंदे करतील असे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींचा उगम संभाजीनगरमध्ये झाला आहे. त्यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत सर्वाधिक पाच आमदार संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील आहेत. मंत्रिमंडळातदेखील सर्वाधिक तीन मंत्रिपद संभाजीनगर जिल्ह्याला मिळाली आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या राज्यभरात एकत्रित होणाऱ्या सभांची सुरुवातदेखील छत्रपती संभाजीनगरमधूनच होत आहे. याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरुवात देखील याच शहरातून होणार आहे.