मुख्यमंत्र्यांचे चलो अयोध्या
#मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. तेथे वातावरणनिर्मिती करण्यासाठी आधीच हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री रविवारी (दि. ९) अयोध्येला जाणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकावरून शेकडो कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकावर निरोप दिला त्यांनी स्वत: कार्यकर्त्यांच्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन रविवारी (दि. ९) अयोध्येत दाखल होईल. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील आपल्या पक्षाच्या मंत्री आणि आमदारांसह अयोध्येत दाखल होणार आहेत.
शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून अयोध्येत शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येला ट्रेनने निघाले आहेत. फक्त ठाणे रेल्वे स्थानकच नाही तर नाशिक रेल्वे स्थानकावरदेखील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खासदार हेमंत गोडसे कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. ठाण्यापाठोपाठ नाशिकमधूनही एक विशेष ट्रेन अयोध्येच्या दिशेला रवाना झाली आहे. या ट्रेनमधून परिससरातील हजारो कार्यकर्ते प्रवास
करत आहेत. वृत्तसंस्था