मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीत!
#मुंबई
शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडून मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच सोमवारी (दि. १३) याबाबत विधानसभेत खुलासा केला. विधिमंडळाच्या वेबसाईटवर या संदर्भातील चुकीचा उल्लेख सभागृहाच्या लक्षात आणून देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारची फिरकी घेतली.
राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देताच सभागृह क्षणभर अवाक झाले. मग त्यांनी विधिमंडळाच्या वेबसाईटवर असा चुकीचा उल्लेख असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. विधान परिषदेच्या प्रतोद पत्रात करण्यात आलेली ही मोठी चूक जयंत पाटलांनी लक्षात आणून दिल्यानंतर ती सुधारण्यात आली.
जयंत पाटील म्हणाले, “विधान परिषदेच्या गटनेतेपदासाठी आमच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांचं नाव सुचवले आहे, पण १० मार्चला एक पत्रक निघाले. त्यात विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते प्रतोद पद रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावर एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे. हे पत्र माॅर्फ नाही. ते अजूनही वेबसाईटवर उपलब्ध आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सध्या राष्ट्रपतिपदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा अनावधानाने देशाच्या पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला होता. शिवाय, स्वत: मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमात त्यांनी ‘आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘स्लीप ऑफ टंग’वरून जयंत पाटील यांनी त्यांची जोरदार फिरकी घेत टोलेबाजी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर देशाचे पंतप्रधानच बदलून टाकले. देशाच्या पंतप्रधानपदी द्रौपदी मुर्मू आहेत, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. आता माझेही विधिमंडळातील गटनेतेपद धोक्यात आले आहे.’’
‘‘नागालँडमध्ये जसे मुख्यमंत्रिपदासाठी रिओ हे सगळ्या पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत,’’ अशी मिश्कील टिप्पणीदेखील जयंत पाटील यांनी केली.
यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, ‘‘जयंत पाटील यांनी दिलेली माहिती ही विधान परिषदेच्या कामाकाजासंदर्भातील आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही, पण विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने या विषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.’’
वृत्तसंस्था