भाजप आमदार राहुल कुल यांनी केला ५०० कोटींचा भ्रष्टाचार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 11:56 am
भाजप आमदार राहुल कुल यांनी केला ५०० कोटींचा भ्रष्टाचार

भाजप आमदार राहुल कुल यांनी केला ५०० कोटींचा भ्रष्टाचार

दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यासंदर्भात संजय राऊत यांचा आरोप

#मुंबई

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना सोमवारी (दि. १३) पत्र लिहिले आहे. यात त्यांनी दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची लूट केली असून यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. हा कारखाना आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आहे.

फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात राऊत म्हणतात, ‘‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन.

पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील 'भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे. या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.’’

‘‘भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत, पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसले,’’ असा टोलादेखील राऊत यांनी या पत्रात लगावला आहे.  

‘‘जनतेच्या पैशांची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ 'ईडी' व 'सीबीआय'च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी,’’ अशी मागणी राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.  या प्रकरणी आता राहुल कुल यांच्यावर कारवाई होणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. राऊत यांनी भाजपच्या आमदारावर केलेल्या आरोपानंतर भाजपचे नेते काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest